पोलिओ म्हणजे काय आणि माझ्या बाळाला तो कसा होऊ शकतो?
पोलिओ हा विषाणूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. यामुळे मज्जासंस्थेला संसर्ग होतो आणि पक्षाघात, श्वास घेण्यास त्रास तसेच कधीकधी मृत्यूदेखील होऊ शकतो. पोलिओचा परिणाम प्रामुख्याने 5 वर्षाखालील मुलांवर होतो आणि तो अत्यंत संसर्गजन्य आहे. हा आजार मुख्यतः फेको-ओरल मार्गाने किंवा सामान्य वाहक घटकाच्या माध्यमातून (उदाहरणार्थ, दूषित पाणी किंवा अन्न) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. तसेच, जर तुमच्या मुलाने दूषित झालेल्या खेळण्यासारख्या वस्तू त्यांच्या तोंडात घातल्या तर त्यामुळे त्याला संसर्ग होऊ शकतो.
माझ्या बाळाला पोलिओ झाला तर काय होईल?
सीडीसी नुसार, पोलिओव्हायरसचा संसर्ग झालेल्या 4 पैकी 1 व्यक्तीमध्ये फ्लूसारखी लक्षणे आढळतात. यामध्ये घसा खवखवणे, ताप, थकवा, मळमळ, डोकेदुखी आणि पोटदुखी यांचा समावेश असू शकतो. काही प्रमाणातील रूग्णांमध्ये मेंदू आणि पाठीचा कणा यांचा समावेश असलेली लक्षणे विकसित होऊ शकतात. पक्षाघात हे पोलिओशी संबंधित सर्वांत गंभीर लक्षण आहे. यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते आणि मृत्यू होऊ शकतो.
माझ्या नवजात बाळाचे पोलिओपासून संरक्षण करण्यासाठीचे मार्ग कोणते आहेत?
पोलिओ रोखण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण. इतर उपायांमध्ये चांगली स्वच्छता आणि योग्य स्वच्छता यांचा समावेश होतो. पोलिओवरील लसीकरणाबाबतच्या अधिक माहितीविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.